चंदनी खोड
"माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, उणे लिंपायाला घाली, घाली सुगंधाचे लेणे...."
खरोखरच या ओळी माझे वडील म्हणजे आमच्या तात्या, (ज्यांचे संपूर्ण नाव आदरणीय वासुदेवराव लक्ष्मणराव देव (टेंभुर्णीकर) आहे), साठी अगदी साजेशाच आहेत. संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी स्वतः झिजून इतरांना शेवटपर्यंत सुगंधच देत राहिले.
कुठून सांगू तेच समजत नाही, कारण माझे लग्नच मुळी तेराव्या वर्षी झाले व मी मांडाखळीकरांची सून म्हणून नऊवारी साडीत गृह प्रवेश केला.
आम्ही एकूण सहा भावंडं, परंतु छोट्या भास्कर चा जन्म तर माझ्या लग्नानंतर झाला. तात्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले ते अगदी लहानपणापासूनच. ते सांगायचे, त्यांचे बालपण अतिशय खडतर व कष्टात गेले. त्यांचे अनुभव ऐकतांना आमच्या डोळ्यांना धारा लागायच्या. खूप वाईट वाटायचे. अहो! ते परभणीला शिकायला होते, तेंव्हा एका गाडग्यात (मातीचे मडके) ज्वारीचे पीठ व एका गाडग्यात मीठ. भाकरी व मीठ खायचे. कधी कधी हरभरा डाळ भिजवून तिच्याबरोबरच भाकरी खायचे. वार लावून पण शिकले आपले तात्या. पण शिक्षणाची खूप आवड व जिद्द, म्हणून नाही हो त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. नंतर त्यांना करोडगिरीत (आजकालचे सेल्स टॅक्स ऑफीस) काम करण्याची संधी मिळाली.
प्रामाणिकपणे व मन लावून काम करायचे, कितीही कष्ट पडले तरीही.....
आमची आई तशी खूप लवकरच गेली, अगदी ३५ - ३६ व्या वर्षीच. पोटाचा आजार झाला, तशी वैद्यकीय सुविधाही त्याकाळी कमीच होती ना. १९६५ साली आई गेली आम्हाला सोडून. मुलं लहान लहान, तात्यांनी मोठ्या कष्टाने व सहनशीलतेने घर व नोकरी सांभाळली. भास्कर तर त्यावेळी दुसरीतच होता. आमची आई तिचे नांव सुलोचनाबाई. माहेरी तिच्या ती खूप लाडकी व नाजूक. पाच मामा व एक मावशी ही तिची भावंडं. आईला कामाची फारशी सवय नव्हती ना, त्यामुळेच तात्या घरातली कामे खूप आवडीने करायचे. दिवाळीचे फराळाचे पदार्थ पण तात्या मस्तच बनवायचे. मोठमोठ्या बेसनाच्या वड्या, लाडू अन् बाजरीचे पीठ व गुळ घालून शंकरपाळे (खजुरा) बनवायचे. आम्हाला खूप आवडायचे हे खजुरा.
मला पण खूप पदार्थ तात्यांनीच शिकवले. ते मला 'बाई' म्हणायचे. मुलांना मस्त मातीचा किल्ला, मुलींना घरकुल खेळभांडे बनवून द्यायचे मस्तपैकी.....
मला तर दसरा झाला की दिवाळी सणासाठी न्यायला यायचे परभणीला, मग मी तर बाई एवढी खुश असायचे ना...
काय सांगू?
चांगली दोन महिने राहायची या उबदार घरट्यात. भाऊ दुर्गादास, प्रेमा, सुमन, भास्कर सगळी सगळी माझी वाट बघत असायची ना...
मी पण परकरी पोरगीच होते. खेळण्या बागडण्याचे वय माझं. आई पण खूप वाट पाहायची बघा, कुसुम येणार म्हणून.....
एकदा तर गंमतच झाली बघा....
लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी मला आले तात्या घ्यायला, दिवाळ सणासाठी. इतका आनंद झाला म्हणून सांगू, तेरा वर्षाची मी पोर... मला सासुबाई नव्हत्याच ना... फक्त ताते साहेब सासरे, हे कधी मांडाखळी ला तर कधी आमच्याकडे असायचे. आनंदाच्या भरात मी तात्यांना पिठलं भाकरीच जेवायला केल्या. त्यांनी खूप आवडीने खाल्ले. आईला जेव्हा हे समजले, तर ती म्हणाली 'अगं! वडील घरी आले, तर वरण भात पोळी करायची, शिरा करायचा.' मी म्हणाले "असं करतात होय! त्यांना आवडते ना भाकरी, मग केली नं मी." निरागस पणे उत्तर दिले मीच त्यावेळी. अशीच एक आठवण, आमच्या प्रेमाचा पाय फॅक्चर झाला होता म्हणून ती हैदराबादला दवाखान्यात ऍडमिट होती. तात्यांची नोकरी पण तिथेच. खूप लांबून यायचे कधी पायी तर कधी एखाद्या वाहनाने डब्बा घेऊन..
तिचे खाणे झाले, की निघाले परत....
कधीही रागावले नाहीत, त्रागा नाही, चिडचिड नाही. म्हणावेसे वाटते त्यांच्यासाठी
"आमचे तात्या म्हणजे अपार कष्ट करणारं शरीर, काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून, आमच्यासाठी झटणारे अंतकरण...."
मला आठवते माझ्या लहानपणी मला टायफाईड म्हणजेच मुदतीचा ताप झाला होता. दिवाळी ऐन तोंडावर आली होती. तर काय सांगू? गाव छोटेसे होते.... नांव आता आठवत नाही हो....
तर काय सांगू, गावातील एकाही घरा ने दिवाळी नाही साजरी केली. केवढं प्रेम होतं त्यांचं आपल्या तात्यां वर..... तसे त्यांनी निर्माण केले. प्रत्येकाला वेळोवेळी आणि अडचणीच्या वेळी शक्य होईल ती मदत करायचे, एका कुटुंबाप्रमाणेच रहात सर्वजण. नंतर मला बरे वाटल्यावर गावकऱ्यांनी म्हणे माझ्या वजना एवढा गूळ वाटला व अत्यंत उत्साहात दिवाळी साजरी केली. मी विचार करते आज काल शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं तेच माहित नसतं ना? पण तात्यांनी किती अन् किती माणसं कमवली.. धन्य त्यांची व मनापासून नमस्कार.... माझे वय आता ऐंशीच्या घरात आहे. जसं आठवलं तसं सांगते आठवणी, मुलं मग लिहून घेतात झालं.. दुसरं काय करणार?
आम्ही लहान असतांना आमच्यासाठी सारख्याच रंगाचं, डिझाईन चे कापड आणायचे (ठाण म्हणायचे त्याला त्यावेळी) व आम्हा सर्वांना त्याचेच कपडे शिवायचे, अगदी आईचे ब्लाउज पण त्याचेच... आणि गंमत अशी, शिंप्याकडे कधीच कुणाला नेले नाही. अगदी रस्त्यावरच्या मुला-मुलींना दाखवून, हा एवढा मुलगा एवढी मुलगी असे सांगून कपडे तयार....
खूप आनंद व्हायचा नव्या कपड्यांचा.
मी व दुर्गादास एकाच वर्गात शिकायचो.
सुमन लहान, तिला सांभाळायला म्हणून मला घरीच ठेवले.
झाले, म्हणून आम्ही एका वर्गात.
दोघात एकच पुस्तक असायचे. एक दिवस पुस्तक नाही म्हणून मी उभी राहायची, तर दुसऱ्या दिवशी दुर्गादास उभा राहणार.
स्वतंत्र पुस्तके घेण्याची परिस्थिती नव्हती. पण मुलांना शिकविले. मी फक्त पाचवी पर्यंत शिकले. प्रेमा, सुमन मात्र मॅट्रिक झाल्या.
तात्या त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, गुरु मंत्र देऊ लागले. त्यांच्या गुरूच्या आज्ञेवरूनच.
खूप मोठा शिष्यपरिवार. नगरला आम्ही रहात होतो, तेंव्हा ह्यांच्या मित्राकडे एकदा गेलो होतो. तर "हे एवढा मोठा" तात्यांचा फोटो त्यांच्या देव घरात. मी आश्चर्याने बोलले "अहो, हे तर माझे वडील आहेत!". तर त्या म्हणाल्या, "अहो ताई, हे तर आमचे गुरु महाराज." तात्यांनी आपले मोठेपण कधीच नाही सांगितले. एकदा नोकरीच्या काळात चोराचा पाठलाग करतांना त्यांच्या डोळ्यात अंधार्या रात्री, बाभळी चा का बोरि चा काटा गेला, व एक डोळा कायमचा गमवावा लागला. तात्यांनी पण एकाच डोळ्याने सारे अध्यात्म वाचन, पोथ्या लिहिणे (हैदराबादचे भटजी बापू यांचे चरित्र, नाथ महाराजांची पोथी) अशी, खूप सारी पुस्तके लिहिली.
आपल्याला खूप कमाल वाटते... माहीतच नसते की, तात्या एवढा 'चकाकता हिरा' आहेत. कारण ते घरात अगदी साधेपणाने वावरत. मी केले असा कधीच बडेजाव नाही. खरोखरच ज्ञानी माणसं असतात ना...
ती अतिशय नम्र व प्रेमळ असतात....
हे तात्या कडे पाहूनच अनुभवले. तात्यांचे खूप शिष्य, म्हणजे आमचे गुरुबंधू आणि भगिनी, सर्वजण आवर्जून भेटतो गुरुपौर्णिमेला. त्यातील डॉक्टर भुसनळे दादा व ताई यांनी तात्यांचे चरित्र व आरती लिहिली. त्यातूनच अनेक अनुभव ऐकायला मिळाले. डोळ्यात पाणी उभे राहते.
आजही तात्या आपल्या बरोबरच आहेत, असा त्यांचे नातू, नाती व आम्हाला नेहमीच अनुभवायला येतं, व येणाऱ्या संकटातून नेहमीच मार्ग दाखवतात, आपले तात्या.
त्यांचे कृपाछत्र असेच मिळत राहो रे बाबा सर्वांना..
हीच देवाजवळ प्रार्थना.
काय सांगू एकेक अनुभव....
ऐका, तात्या आमच्याकडे नगरला आले होते. आमचे शेजारी म्हणाले 'इथे किर्तन करा ना तात्या महाराज'. तर तात्या म्हणाले "मला देऊळगाव राजा ला किर्तन करायचे आहे, आधीच ठरवले आहे गावकऱ्यांनी. ते माझी वाट पाहत असतील. मला गेलेच पाहिजे", पण आमच्या सगळ्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे राहिले व छान कीर्तन केले व दुसऱ्या दिवशी जालन्याला गेले...
तर काय देऊळगाव चे लोक मुद्दाम भेटायला आले, व म्हणाले 'महाराज! काय सुंदर कीर्तन केले तुम्ही, आणि नेहमीपेक्षा छान बर का..'.
आता मात्र तात्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले, मनात म्हणाले हात जोडून "देवा, माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेस.... प्रत्यक्ष देवाने त्यांच्या रूपात किर्तन केले, प्रत्यक्षपणे.
असे अनेक अनुभव तात्यांच्या पोथीत वाचायला मिळतात.
आता बरीच शिष्य मंडळी आपल्यात नाहीत. पण हा वारसा पुढे माझे भाचे डॉ. राजेश, सुधीर, विशाल, या सोबत संतोष, संदीप, अतुल, राहुल, माझा मुलगा धनु हे अत्यंत आपुलकीने चालवत आहेत. माझ्या भावजया पण त्यात हिरीरीने भाग घेतात. भाच्च्या, सुना,मुली सर्वजण मिळून छान गुरुपौर्णिमा साजरी करतात.
तात्या व आईचा वेलू गेला गगनावरी...
त्याला फळे आली अमृता परी....
तात्या आम्ही आहोत खरंच भाग्यवान.....
देता आम्हाला ग्रंथरूपी ज्ञान.....
शून्यातून सर्व उभारून घालून दिला आदर्श..... तुम्ही आहात खूपच महान.....
बस आणखी काय सांगू.......?
तुमचीच लाडकी, प्रमिला (कुसुम) मांडाखळीकर, पुणे.