मी पूर्वाश्रमीची कुमारी सुमन देव. आत्ताची सौ. स्मिता किशोर देशपांडे. तात्या विषयीचे मला आलेले अनुभव येथे मांडत आहे. आमचे तात्या खूप चपळ, हुशार व एकपाठी होते. आई-वडिलांच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी अवघ्या दोन ते तीन वर्षातच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण केले, व करोड गिरी (आताचे सेल्स टॅक्स ऑफीस) मध्ये पेशकार म्हणून लागले. तांबेवाडी भूम परांडा या ठिकाणी. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्या वेळच्या कुलकर्णीच्या मुलीशी मथुरा शी यांचा विवाह झाला. चार मुले, तीन मुली असा त्यांचा सुखी परिवार होता. भक्ती आणि अध्यात्म हा त्यांचा आवडीचा प्रांत. त्यावर उत्तम कीर्तने आणि प्रवचने करून त्यांनी भक्तांची मने जिंकली, आणि त्यांच्या या प्रेरणेतून लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यात शिष्यांनी पुढे गुरुपौर्णिमेला त्यांचा उत्सव सुरू केला. 1964 मध्ये एक चमत्कार झाला. कलियुगात असा चमत्कार होणे अशक्य आहे. तरी तुम्ही ऐकला तर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. मी त्यावेळी सातवीत किंवा आठवीत असेल, आई खूप आजारी पडली. तिला औरंगाबादच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. एके दिवशी अचानक डॉक्टरांनी सांगितले 'सुलोचना वासुदेव देव या देवाघरी गेल्या'. तो दिवस अमावस्येचा दिवस होता. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. इतकी पुण्यवान बाई, अमावस्येच्या दिवशी कशी गेली? तेव्हा तात्या सर्व पोथ्या घेऊन एका खोलीत गेले. तेथे ते देवांशी काय बोलले माहित नाही. पन.... पन..... मृत घोषित झालेली माझी आई परत जिवंत झाली. सगळे डॉक्टर लोक आश्चर्यचकित झाले. आईच त्यांना म्हणाली "अहो मला किती झोप लागली. तुम्ही मला का उठवले नाही?" हे मी स्वतः माझ्या कानांनी ऐकले. मी आणि भास्कर माझा सर्वात लहान भाऊ, आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशाप्रकारे अमावस्या टळली. दुसऱ्या दिवशी, गुढीपाडव्या सारख्या शुभ दिवशी, ती देवाघरी गेली. ही सर्व तात्यांची श्रद्धा, विश्वास आणि सामर्थ्य होते, असे मला प्रामाणिक पणे वाटते. 1980 मध्ये तात्या जेव्हा आजारी पडले, तेव्हा मी त्यांच्या जवळ होते. तात्या आणि मी बऱ्याच गप्पा मारायचो. त्यात त्यांनी मला एकदा सांगितले, त्यांना घ्यायला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान येणार आहेत. काही दिवसांतच अखेर 11 जून 1980 ला संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, आणि त्यांच्या उशाशी असलेल्या नरसिंहाच्या फोटोला मोठा तडा गेला. मला वाटते त्यांना घ्यायला श्रीकृष्ण भगवान यांचा रथ आला होता. कारण वातावरणात अतिशय प्रसन्नता होती. उदासीनता बिलकुल नव्हती.