सौ सविता सुहास मोहरीर

 

मी सौ सविता सुहास मोहरीर ( सविता दुर्गादासराव देव) म्हणजेच सद्गुरु वासुदेवराव देव यांची नात. माझ्या आजोबा बद्दल किती सांगावे तेवढे कमी आहे, मी त्यांची नात म्हणून जन्मले हेच माझे परम भाग्य आहे. ते आम्हा सर्व नातवंडांचा खूप लाड करत असत. आम्ही जालन्याला असताना मलाही त्यांचे  प्रवचन ऐकण्याचे भाग्य लाभले होते त्यावेळेस मी लहान होते ते मला घेऊन गेले होते. ते आम्हा नातवंडांना खूप छान गोष्टी सांगायचे त्यांनी आम्हाला खूप चांगली शिकवण दिली मी पाचवीत असतानाच त्यांचा स्वर्गवास झाला तरी आजही ते आमच्या सोबत आहेत. सुखदुःखात पाठीशी आहेत मला आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आजोबांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मला चांगले सासर मिळाले चांगला जोडीदार ही मिळाला, पण माझ्या पहिल्या गरोदरपणात बाळाची वाढ व तब्येतही छान होती नऊ महिने नऊ दिवस ही झाले होते आमच्या फॅमिली डॉक्टरांनी प्रसूती ही नैसर्गिक होईल असे सांगितले होते. पण दुर्दैवाने तसे काहीच घडले नाही बाळ पोटातच मृत्यु पावले तेव्हा मी खूपच दुःखी झाले निराश झाले. डॉक्टरांना समजले नाही का आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. नेमके त्याच काळात माझे आजोबा त्यांचे परमशिष्य डॉक्टर यशवंतराव भुसनळे यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले माझे नात खूप घाबरली आहे दुःखी आहे.  मी दत्ताचा मंत्र सांगतो तो तिला सांगावा आणि त्यानंतर तिला आयुष्यात कधीही कुठला त्रास होणार नाही अडचण येणार नाही सगळे चांगले होणार आहे, काळजी करू नकोस म्हणून सांगा.  दुसऱ्या दिवशी डॉक्टर भुसनळे यांनी माझ्या बाबांना परभणी ला फोन केला आणि म्हणाले तुमच्या मुलीच्या बाबतीत अशात काही दुःखद घटना घडली आहे का, त्यावर बाबांनी सर्व काही सांगितले. तेव्हा त्यांनी तात्यांनी दिलेला मंत्र बाबांना सांगितला व तो बाबांनी मला लिहून पत्राने पाठविला. मी अगदी मनोभावे तात्यांनी सांगितलेल्या मंत्राचा जप केला आणि वर्षाच्या आतच मला एक सुदृढ आणि गोंडस मुलगा झाला, त्याचे जन्म नाव वासुदेव असे निघाले.        भुसनळे काकांनी मला पत्र पाठवले त्यात ते म्हणाले तुझ्या आजोबांचे छाया तुझ्याकडे आलेली आहे अजूनही ते पत्र मी सांभाळून ठेवले आहे. माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने माझा संसार खूप सुखाचा चालू आहे माझी दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत मी खूप आनंदी आहे.  तात्यांनी दिलेला दत्ताचा  मंत्राचा जॉब मी आज पण करते व मंत्राचा जप केल्यानंतर मला खूप आत्मिक समाधान मिळते. माझ्या आजोबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.