सौ. सुषमा पद्माकर बुद्रुककर, परभणी

 

आमचे आजोबा

"तात्या आजोबा खूप खूप वर्ष झाली ना तुम्हाला जाऊन आणि तितकीच वर्ष झाली तुम्हाला पाहून"

 पण दररोज आठवण येते तुमची अगदी मनापासून..."

 आमचे आजोबा अतिशय ज्ञानी व योगी पुरुष खूप गाढा अभ्यास ग्रंथसंपदेवर.... त्यांच्या बद्दल लिहायचे म्हणजे तेजस्वी सुर्या बद्दल एका पणतीने लिहावे पण प्रयत्न करते.... आजोबांनी करोड गिरी (म्हणजे आताचे सेल्स टॅक्स ऑफिस) मध्ये नोकरी केली माझ्या बाबांचे वडील आम्ही सगळे त्यांना तातेसाहेब म्हणायचो दोघे एकाच ठिकाणी कामाला. तात्यांचा जन्म 1902 साली झाला. उत्तम प्रपंच करणे व परमार्थ ही  साधणे हे एकाच ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे आमचे तात्या आजोबा अतिशय साधी राहणी, गर्व कशाचा नाही.

 आजोबांचा खूप अभ्यास धार्मिक ग्रंथावर ते प्रवचन व कीर्तन करत असत, परंतु कर्मकांड व अंधश्रद्धा मात्र अजिबात नाही, माणसातच देव पहा असं ते सांगत.

 आम्हाला आजोबांचा सहवास भरपूर मिळाला आम्ही सर्व नातवंड स्वतःला भाग्यवान समजतो त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार चिरकाल टिकून आहेत व ते पुढील पिढीला देण्याचं काम आम्ही करत आहोत.

 आमचे आजोबा  जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी गावचे. आजोबांच्या बदल्या होत असं वारंवार. आमची आजी 1965 गेल्या मुळे लहान लहान खूप खस्ता खाल्ल्या त्यांनी प्रापंचिक जीवनात, पण कधी ही हार नाही मानली. आजी खूप शांत स्वभावाची होती

 आजोबा जेव्हा आमच्याकडे नगरला, धुळ्याला, परभणी ला यायचे भास्कर मामाला घेऊन तेंव्हा खुपचं धमाल यायची, सुट्टीत मावस व मामे भावंडं एकत्र यायचो अन् तात्या आजोबा आमच्याबरोबर मुलात मुलं होऊन खेळायचे, गोष्टी सांगायचे पंचधातूच्या एवढ्या मोठ्या मोठ्या आणायचे, खूप सारे पेन,  गोष्टींची पुस्तके, मातीचा किल्ला बनवायचे दिवाळीत.नातवंड म्हणजे जीव की प्राण, जणू दुधावरची सायच.

  आम्हाला फटाके उडवावे वाटायचे, पण भीती वाटायची अशावेळी आजोबा लांब काडीला फटाका बांधून द्यायचे. ते जेव्हा गावाला जायला निघायचे, तेव्हा मी म्हणायचे तात्या राहा ना अजून..

 तर मिस्कीलपणे म्हणणार राहतो, पण तुझी आई पुरणपोळी करत असेल तर नक्की....

 त्यांना आईच्या हातची पुरणपोळी खूप आवडायची.

 तात्या नंतर गुरुमंत्र देऊ लागले, यांच्या गुरुच्या आज्ञेवरून. त्यांचा फार मोठा शिष्य परिवार खान्देशात धुळे, एरंडोल, जालना, परभणी, नानेगाव, अहमदनगर, औरंगाबाद.

 त्यामधील भुसनळे मामा यांनी तात्यांचे चरित्र लिहिले त्यात एकेक अनुभव वाचू, ऐकू लागलो तर डोळ्यात पाणी येते अन वाटते किती ग्रेट होते नं आपले आजोबा... सारखे फिरायचे पण कधी थकलेले, कंटाळलेले, उदास नाही दिसले, कारण देवाचे काम करण्यासाठी देवच त्याना शक्ती देत होते. परभणीला आले म्हणजे दुर्गादास मामाचे घर ममता कॉलनी आमचे नानलपेठ खुप अंतर, पण पायी जायचे. सकाळीच निघायचे, परत दुसऱ्या दिवशी जाणार. मामा अॉफीस ला गेला होता, सुधीर शाळेत गेला म्हणून परत चक्कर करणार. प्रचंड उत्साही व्यक्तीमत्व.

तात्यांना तीन मुले व तीन मुली आमचे मामा, मावशी, मामी ही त्यांच्यासारखेच संयमी व प्रेमळ, सगळ्यांना आपलंच मानणारे, परके कुणीच नाहीत, जीव लावणारी मंडळी म्हणजे माझे आजोळ, देव आडनाव लावणारी देव माणसं... आणि हो हाच वारसा पुढील पिढीतही पाहायला मिळतोय.

 मी अनुभवलेला आजोबा शब्दाचा अर्थ पहा.

 आ = आयुष्यभर कष्ट करून नातवंडा वर उत्तम संस्कार करणारे 

जो = जो पर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सर्वांना एकत्र बांधणारे बा = बालपणाचे जुळं भावंडं म्हणजे वृध्द पण.

 म्हणूनच आजी आजोबा व नातवंड यांचं मस्त मेतकूट जमतं. गुरुपौर्णिमेचा जालन्याला दरवर्षी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने उत्सव साजरा होतो. आम्ही सर्व जण आवर्जून भेटतो व वर्षभर पुरेल एवढी सकारात्मक ऊर्जा सोबत नेतो.

 तात्या आजोबांचे नातू, पणतू- सुना डॉक्टर, इंजिनियर आहेत. मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत ही सर्व तुमचीच कृपा आहे आजोबा....

 "आजोबा व नातवंड यांचं अनोखं नातं असतं,  

सगळ्यां नात्या पलीकडले...

 हाताचं बोट धरून चालवणारे, 

मुलं, नातवंडं मोठी व्हावीत म्हणून झटणारे, खूप कर्ज आहे आमच्यावर प्रेमाचं अन मायेचे, कसे ऋण फेडू आम्ही तात्या तुमचे...."  खरेच आहे हे ऋण तर नाही फेडू शकत, पण तुम्ही घालून दिलेल्या पायवाटेवरून चालण्याचा प्रयत्न सुरूय.

 तुमच्यामधील दहा टक्के तरी गुण आमच्यात यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....

 "असे आहेत आमचे तात्या आजोबा महान.... म्हणूनच वाटतो आपला सदैव अभिमान....."

 तात्या आजोबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आम्हा सर्व नातवंडां कडून...